वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत असल्याचा आरोप मनसेने केला. त्यामुळे या सर्वांच्या चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी करुन तशी माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस विभागाकडे केली आहे. याआशयाचे निवेदन काल वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्या नेतृत्वात पोलीस उपविभागीय कार्यालयात देण्यात आले.
वणी तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात विविध भागात कोळसा खदानी मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरातील मोठ्या कोळसा खाणीतून दिवसाकाठी कोळशाच्या हजारो टनांची मालवाहतूक होत असते. असंख्य परप्रांतीय कामगार रोजगाराच्या निमित्ताने या परिसरात स्थायिक झाले आहे.
परंतु ह्या कोळसा खदानी निर्धारित कंपन्यामध्ये परप्रांतीय कामगार गुन्हे दाखल असल्याचे कळून आले. त्यांची कुठेही नोंद कामगार म्हणून नाही तसेच चारित्र्य पडताळणी नाही. जर या कामगारांच्या चारित्र्य प्रमाणपत्राची सखोल चौकशी केल्यास त्यांच्यावर असेलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती समोर येईल. परिणामी परिसरात ह्यांच्याकडून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहे. त्याची नोंद सुद्धा आपल्या विभागाच्या दप्तरी आहे. यामुळे सामन्यांत दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
कोळसा खदानीत व ओ. बी. कंपन्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी करून त्यांना कामावर ठेवण्यासाठी त्यांची चारित्र्य पडताळणी करावी, कामगार म्हणून कंपन्यांनी नोंद करावी. या कंपनीत किती कामगार आहेत त्यांची माहिती सुद्धा नाही किंवा त्याची नोंद नाही. त्यामुळे या कंपनीतील सर्व व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्राची चौकशी करावी. तसेच ज्या कामगारांकडे हे चारित्र्य प्रमाणपत्र नसेल त्यांना कामावरून कमी करण्याची सक्त ताकीद संबधित सर्व कंपन्याना देण्यात यावी. व ज्या कामगारांवर गुन्ह्याची नोंद असतांना देखील या गुन्हेगाराला रोजगाराच्या नावाखाली याठिकाणी आसरा देऊन त्या गुन्हात मदत म्हणून संबधित कंपन्यावर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्य कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाअधिकारी कार्य. यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशासन यवतमाळ यासह जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ यांना सुध्दा पाठविण्यात आल्या आहे.