Home / महाराष्ट्र / खानदेश / ✍️ *शील हा आचार धम्...

महाराष्ट्र    |    खानदेश

✍️ *शील हा आचार धम्म*

 ✍️ *शील हा आचार धम्म*

प्रा. रंगनाथ धांडे

मो. +91 86239 01586

 

 

 

    तथागतांचा धम्म हा भारतीय नीती, ज्ञान आणि सहिष्णुतेचे प्रतीक आहे.  त्यांच्या धम्म सिद्धांतातून निर्मळ मन, ज्ञानातून शुद्ध विचार आणि ह्रदयातून करुणेचे प्रगटीकरण होते.  मुळातच तथागतांचा धम्म हा मानवी दुःख नाहीसे करण्यासाठी, जीवनाचा निरंतर व सतत घेतलेला एक सुखाचा शोध आहे.  अफाट विश्वाशी आणि निसर्गाशी तादात्म्य पावण्याची एक प्रक्रिया आहे.

    प्रज्ञा, शील आणि करुणा या उच्च तत्वांवर तथागतांचा सद्धम्म अधिष्ठित आहे.  ही तत्वे धम्माच्या तत्वज्ञानाचे आधारस्तंभ आहेत.  धम्माची ही सौर मूलतत्वे आहेत.  विवेकाची, नैतिकतेची आणि संवेदनशील ह्रदयाची बैठक त्यातून धम्माला प्राप्त झाली.  प्रज्ञा, शील, करुणा यांचा बुद्धी, मन आणि सह्रदयातून स्त्रोत असतो.  त्यात धम्माचे खरे सामर्थ्य सामाविलेले आहे.  धम्म तत्वज्ञानातून तथागतांनी जगाला अहिंसा व शांतीचा महामार्ग दाखविला.  प्रज्ञा प्राप्तीने धम्म विवेकवादी, शीलाच्या प्रत्यक्ष आचरणाने तो नितीवादी आणि करुणाच्या आचरणाने तो मानवतावादी बनला.  धम्म विवेकवादी, नितीवादी आणि मानवतावादाची कास धरणारा आहे.  माणसाचा गौरव करणारा प्रेमळ धम्म आहे.  *'धम्माचे तत्वज्ञान, करी शुद्ध मन, गाते गुणगान, माणसाचे.'*

    धम्माच्या तत्वांचे आचरण हीच बुद्ध पूजा आहे.  बुद्धांनी स्वतःपेक्षा धम्म हा अधिक मोलाचा असल्याचा उपदेश केला.  म्हणून त्यांनी धम्मात स्वतःचे स्थान अढळ निर्माण केले नाही.  हे संकल्प गाथेतून स्पष्ट होते.

 *'इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि ||'*

    म्हणजे तथागतांनी उपदेशल्याप्रमाणे प्रज्ञा, शील आणि करुणा ही धम्म तत्वे आचरणात आणून बुद्धांना खऱ्या अर्थाने वंदन करतो.  बुद्धांच्या मूर्तीची पूजा आपण पुष्प, दीप आणि धूपच्या सहाय्याने करतो.  हे अर्पण करण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की, पुष्प, दीप आणि धूप हे प्रतिके आहेत.  पुष्प हे अनित्यतेच्या सिद्धांताच्या शिकवणीचे प्रतीक असून मानवी शरीर पुष्पाप्रमाणे कोमेजून, निस्तेज होऊन नष्ट पावणार आहे.  सर्व अनित्य आहे म्हणून आसक्ती ठेवू नये.  दीप हे बुद्धांच्या प्रज्ञाचे प्रतीक आहे.  बुद्धांनी आपल्या प्रज्ञारुपी दीपाने अज्ञानरुपी अंध:काराला नष्ट केले म्हणून आपण दीपाने प्रज्ञाची पूजा करतो.  धूप म्हणजे सुगंध. सुगंध हे शीलाचे प्रतीक आहे.  धूपाचा सुगंध सर्वत्र दरवळतो तद्वतच शीलवान मनुष्याची कीर्ती दूरवर पसरते.  वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा शीलवानाचा सुगंध दरवळतो.  धूपाने आपण शीलाची पूजा करतो.  परिणामी या प्रतिकांनी बुद्धांची पूजा करून आपण आचरणासाठी स्वतःला सजग आणि सज्ज करीत असतो.  आपण धम्म आचरणापासून विचलित होऊ नये.  हा हेतू त्यामागे असतो.  अंतःकरणाला धम्माची गोडी निर्माण झाली की, तुमचे धम्म आचरण इतराच्या मनाला भावते.  तो भारावून जातो, नकळत तुमचे मोठेपण मान्य करतो.  उच्चतम मूल्यांच्या आचरणाने होणारा आनंद उच्च दर्जाचा असतो.  

    'ज्ञानातून मनुष्याने बुद्धीचा वापर केला पाहिजे', हे सूत्र प्रथम बुद्धांनी सांगितले.  ज्ञान हे परिश्रमाने साध्य होते.  मनुष्याला प्राप्त झालेली अलौकिक देणगी म्हणजे बुद्धी, बुद्धीचा सुयोग्य वापर म्हणजे प्रज्ञा.  प्रज्ञाने मनुष्य विचारांची पारख करून सत्य विचार बुद्धीने स्वीकारतो. प्रज्ञाच्या प्रकाशातून अंध:कारातून मार्ग काढतो.  विचाराच्या नियोजनातून प्रज्ञा प्राप्त होते.  ती विचाराची परिपक्वता असते.  प्रज्ञेची हानी ही आपल्या आप्तेष्टाला गमविण्यापेक्षा मोठी असते.  म्हणून प्रज्ञेची वृद्धी आणि परिवहन करण्याचा उपदेश तथागत आपल्या भिक्खू संघाला देतात.

    *शील :-*  मनुष्याच्या वर्तनाचा सुगंध म्हणजे शील.  दुसऱ्या प्रचलित शब्दांत पापभिरुता म्हणजे शील.  शील नीतीमत्तेचा सनदशीर मार्ग आहे.  शील, चारित्र्य मनुष्याचे सौंदर्य आहे.  ऐहिक जीवनाला नितीचे अधिष्ठान देणारे शील आहे.  प्रज्ञाला शीलाची जोड पाहिजे, ही धम्माची अट आहे.  यालाच *'सद्धम्म'* असे म्हणतात.  याचे विवेचन डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या तृतीय खंड, भाग पाचवा अंतर्गत केले आहे.  प्रज्ञा हा विचार धम्म आहे.  शील हा आचार धम्म आहे.  'योग्य विचार करण्याची पद्धत' प्रज्ञेची आहे, तर 'योग्य वागण्याची पद्धत' शीलाची आहे.  मनुष्याला प्रज्ञा आवश्यक आहे, तद्वतच शील सुद्धा आवश्यक आहे.  प्रज्ञेला अन्न म्हटल्यास शरीराला पाणी ची उपमा द्यावी लागेल.  शीलाशिवाय मनुष्याजवळ प्रज्ञा असेल तर ती प्रज्ञा भयकारक आहे.  तो मनुष्य इतरांची फसवणूक करेल.  प्रज्ञा ही माणसाच्या हातातील दुधारी तलवारीसारखी आहे.  शीलवान मनुष्याने धारण केल्यास तिचा उपयोग इतरांचा जीव वाचविण्यासाठी अथवा भल्यासाठी होईल.  पण शीलाविरहित मनुष्याच्या हाती ती तलवार लागल्यास ती दुसऱ्याची हत्या करण्यासाठी होईल.  म्हणून प्रज्ञाला शीलाची जोड असली पाहिजे.  प्रज्ञा, शील आणि करुणा यांना एकमेकांपासून भिन्न करता येणार नाही.  त्यांचे अजोड नाते आहे.  ही तिन्ही तत्वे वेगवेगळी केल्यास सत्वहीन आणि तत्वहीन बनतील.  प्रज्ञाविरहित शील आणि करुणा ही दृष्टीहीन बनतील.  अज्ञानी भक्ताप्रमाणे शीलविरहित प्रज्ञा ही समाज विध्वंसक बनेल.  ही प्रज्ञा, शील अभावी इतरांची, समाजाची लुबाडणूक करेल.  दुसऱ्याचा घात करेल.  समाजाचे कल्याण होणे दूर, अहितच होईल.  करुणा विरहित प्रज्ञा आणि शील असलेला मनुष्य स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो.  'स्वार्थ बुद्धीचा प्रसाद असतो.'. ही मनोवृत्ती त्याची असते.  त्याच्या मनात समाजहिताचा विचार डोकावणार नाही.  

    जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देणगी देण्यास महत्व असते.  मागितल्यात, घेण्यात स्वार्थ दडलेला असतो.  देण्यातच दातृत्व असते, नि:स्वार्थ असतो.  वाईट विचार, कलुषित मन, संकुचित अंतःकरण नसावे.  म्हणजे सुख तुमच्या शोधार्थ येईल.  त्यासाठी धम्माचे मन असावे लागते.  'धम्माचे मन, विचाराचे सण.'  प्रज्ञा, शील, करुणा या तत्वांच्या अभ्यासामुळे आणि आचरणामुळे प्रज्ञा प्राप्तीने,  शील पालनाने आणि करुणेच्या सह्रदयाच्या मनुष्याचे दुःख क्षीण होऊन लय पावते.  मनुष्य दुःख मुक्त होऊ शकतो आणि सुखाची अनुभूती होऊ शकतो.

    मनुष्याचे शुद्ध आचरण कसे असावे, हे प्राधान्यक्रमाने धम्माच्या पंचशीलमध्ये सांगितलेले आहे.  शीलाचे पालन करण्यासाठी काय त्याज्य आहे याचे शीलांतर्गत मूलभूत तत्वे सांगितली आहेत.  त्यास अनुसरून आपले वर्तन असले पाहिजे.  स्त्री-पुरुष, लहान-थोर या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी व सर्व जगातील व्यक्तींसाठी पवित्र आणि निर्मळ आचरणासाठी शील अत्यावश्यक आहे.  शीलाविषयी तथागतांनी पाच मूलतत्वे सांगितली आहेत.  त्याला 'पंचशील' असे म्हणतात.

    १) *जीवहत्येसंबंधी-* कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे.

    २) *चोरीसंबंधी-* चोरी न करणे.

    ३) *अनितीसंबंधी-* व्यभिचार न करणे.

    ४) *खोटे बोलण्यासंबंधी-* असत्य न बोलणे.

    ५) *मद्यपानासंबंधी-* मादक पेय ग्रहण न करणे.

‌  हे पंचशील तथागतांच्या धम्माचा पाया आहे.  मूलभूत धम्म कायदा (निर्बंध) म्हणजे पंचशील.  हा आदर्श जीवनाचा मूलमंत्र आहे.  मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला तेजस्वी आणि शीलवान बनवून समाजापुढे प्रकाशित करण्याचे काम, पंचशील करते.  पंचशील ही‌ तथागतांची आराधना करणारी प्रार्थना नाही.  त्यांची स्तुती गाणारी आरती नाही, तर निर्दोष अभिव्यक्त होण्याची कृती आहे.  आदर्श व्यक्तींसाठी ती वैश्विक पातळीवरची जगण्याची आचारसंहिता आहे.  पंचशील हे मानवी जीवन मूल्ये आहेत.  मानवाचे सुख निरोगी काया आणि निरोगी वर्तनात सामाविलेले आहे.  म्हणून निरोगी काया आणि निरोगी वर्तनासाठी तथागतांनी पंचशीलचा उपदेश केला आहे.  'जीवन जगण्यास मिळते उभारी, व्यक्तिमत्वासाठी पंचशील भारी'.  आदर्श माणूस घडविणे, हे पंचशीलेचे ध्येय आहे.  पंचशील हे मिरविण्यासाठी नाही, तर शीलवान बनण्यासाठी आहे.  'पंचशील निर्मळ जगण्याचा विचार, मनुष्याच्या जगण्यातला काढून टाकतो विकार'.  सोप्या शब्दांत काया, वाचा, मने शुद्ध असली पाहिजेत.  पंचशील ही दुःखमुक्तीची बाराखडी आहे.  तथागतांचा धम्म हा केवळ जगण्याची जीवनशैली नसून, ती आदर्श जीवन जगण्याची जीवन पद्धती आहे.  जीवन व्यवहाराचे नियमन आहे.  'धम्म नीती, मनुष्याची जीवन पद्धती.'

    समाजात हत्या, भ्रष्टाचार, बलात्कार, चोरी आणि भाडणे हे पंचशील पालनाच्या उल्लंघनातून उत्पन्न होतात.  त्यामुळे मानवी जीवनातील अनेक समस्यांना सामना करावा लागतो.  'झाला‌ शील भ्रष्ट, गेले वाया कष्ट'.  उपरोक्त समाज रोगाच्या मुळावर पंचशील घाव घालते.  मूळापासून रोगाला समूळ नष्ट करते.  पंचशील माणसाला माणूस म्हणून जगण्याची जीवनशैली आहे.  माणसाच्या चेहऱ्यावरील तेज हे माणसाच्या पंचशीलच्या आचरणावर अवलंबून असते.  'पंचशील आहे जीवनाचे सौंदर्य, त्याचे पालन करणे हे औदार्य.'  पंचशीलच्या आचरणाने मनुष्य सुंदर बनतो.  त्याचे मन प्रसन्न होते.  त्याला स्वविश्वास प्राप्त होतो.  धम्माने आनंदाचे किरण आसमंतात पसरतात.  सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित होते.  मनुष्याचे बाह्य स्वरूप कसे आहे, त्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने मनुष्य श्रीमंत असला पाहिजे.  ते सौंदर्य शीलाच्या प्रतापाने प्राप्त होते.  पंचशील मनुष्याला अखेरपर्यंत माणुसकीने वागायला शिकविले.  'चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शरीराने.'

    धम्म हा अमर्यादित निर्बंध नाही.  ऐच्छिक नियमाचे पालन नाही.  मनमानी जगणे नाही.  धम्म हा त्याग आणि भोग यामधील मध्यम मार्ग आहे.  'स्वैर वर्तनाला पंचशील शेषन, उपद्रव मुक्त वागणे‌ हे त्याचे शासन.'  मनुष्य समाजशील प्राणी आहे.  तो समाजात सहजीवन जगतो.  सहजीवन सभ्यतेचा स्थायीभाव आहे.  धम्मानुभूतीतून नात्याची घट्टवीण गुंफतो.  जगणे हे नात्याचे कदर करणारे आहे.  नाते रक्ताचे नसले, तरी नात्याची भावना रक्तात असावी, ही भूमिका धम्म पार पाडतो.  

    जीवन विद्या कलेच्या दृष्टीने मनुष्याचे दोन प्रकार पडतात.  

१) सज्जन २) दुर्जन.  शील पालन करतो तो सज्जन, याउलट शीलाचे उल्लंघन करतो तो दुर्जन.  शील पालनाच्या सद्गुणांनी सुख आणि शील उल्लंघनाच्या दुर्गुणांनी दुःख प्राप्त होते.  दुर्जन मनुष्यतील दुष्टत्व संपवून मनुष्य घडविणे ही पंचशीलेची फलनिष्पत्ती होय.  सुकलेल्या फुलांना बहर यावा, तद्वतच धम्माच्या अद्वितीय तत्त्वज्ञानाने दुर्जन मनुष्य सज्जन बनतो.  जीवन परिपूर्ण आणि समृद्ध करण्यास शील कारणीभूत ठरते.  त्याचे उदाहरण अंगुलीमाल होय.  अंगुलीमाल डाकू, धम्माच्या उपदेशाने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली, तो भिक्खू बनला.  'पंचशील हे दुर्गुणांपासून करते सावधान, जीवन सकस जगण्याचे ते वरदान.'

    तथागतांनी प्रज्ञापेक्षा शीलाला महत्व दिले आहे याचे कारण असे की, प्रज्ञाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे.  शील नसेल तर प्रज्ञा ही निरर्थक, मूल्य हीन व नाशकारक ठरते.  कारण प्रज्ञेचा उपयोग इतरांना फसविणेसाठी करेल.  शीलासारखे रत्न जगात दुसरे नाही.  शील हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  शील जीवनाचे प्रारंभ आणि शेवट सुद्धा आहे.  शीलाच्या आचरणात सर्व कल्याण सामाविलेले आहे.  शील सर्व कल्याणाचे आगमनस्थान आहे.  शील सर्व चांगल्या अवस्थांतील सर्वोत्तम अवस्था आहे.  म्हणून आपले शील शुद्ध करण्याचा उपदेश धम्मात तथागतांनी दिला आहे.  मनुष्याने शीलवान झाले पाहिजे.  शीलाप्रमाणे जीवन जगले पाहिजे.  शीलाने मनुष्याचे जीवन उजळून निघते.  शील संपन्न मनुष्यावर लोक प्रेम करतात.  धम्म संस्कृती ही शीलप्रधान आहे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर शीलाचे महत्व अधोरेखित करताना म्हणतात, 'शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे' किंवा 'शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.'

    तथागतांचा धम्म मनुष्य मात्राची, जीवजंतूची काळजी घैतो, माणूस घडवितो, आदर्श समाज निर्मिती व राष्ट्र निर्मिती करण्यास कोठेही उणा पडत नाही.  ही धम्माची खासियत आहे.  धम्म सभ्य समाजाचा आरसा आहे.  म्हणून धर्मासारखी धम्म रक्षणासाठी कोणाची हत्या करण्याची आवश्यकता भासत नाही.  धम्म रक्षणासाठी शीलाचे आचरण करावे लागते.  धम्म आपल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण तत्वामुळे विदेशात सन्मानाने विराजमान झाला आहे.  प्रज्ञा, शील, करुणा या विचारतत्वाने तो ओतप्रोत भरलेला आहे.  धम्म जाणून घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतो.  त्यातील प्रज्ञा ही विचारातील सत्य जाणण्यासाठी, शील वागण्यासाठी आणि करुणा ह्रदयाला स्पर्श करण्यासाठी धम्मात क्रियाशील आहे.  प्रज्ञाने विचारांना तात्विक बैठक प्राप्त होते.  करुणाने भावनांची संवेदना वृद्धिंगत होते.  बुद्ध कुणावर आसक्तीने प्रेम करीत नाहीत आणि कोणाचा तिरस्कार करीत नाहीत, पण त्यांच्या मनात प्रत्येक प्राणी मात्राविषयी, जीवजंतुविषयी अपार करुणा आहे.  बुद्ध म्हणजे अपार प्रेम आणि प्रचंड विद्वत्ता.

    तथागतांचा धम्म हा आस्तिक नाही आणि नास्तिकसुद्धा नाही.  तो वास्तववादी आहे.  म्हणून धम्मात अंधश्रद्धेने नव्हे तर प्रज्ञेने, भीतीने नव्हे तर नीतीने, क्रूरतेने नव्हे तर करुणेने आचरण अपेक्षित आहे.

©©©©©

संदर्भ : दैनिक "सम्राट"

         सोमवार, दि. ३० जानेवारी २०२३

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...