Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

36.95

Home / महाराष्ट्र / कोकण / *सर्व पालकांनी अवश्य...

महाराष्ट्र    |    कोकण

*सर्व पालकांनी अवश्य वाचावी व आत्मपरीक्षण करावी अशी पोस्ट*. *"मी अतिरेकी पालक आहे ?"*

*सर्व पालकांनी अवश्य वाचावी व आत्मपरीक्षण करावी अशी पोस्ट*.             *

भारतीय वार्ता :

 

"तिचा अभ्यासच होत नाहीय सर. किती प्रयत्न करतेय ती,पण यशच नाही बघा तिच्या कष्टांना.." असं म्हणून ती माऊली फोनवरच रडायला लागली.

 

इयत्ता बारावीत शिकणारी मुलगी. रोज दिवसभर अभ्यास करते,रात्रीही जागरणं करते,पण आता परिक्षा जेमतेम महिन्यावर येऊन ठेपली आहे,तरीही माझा अभ्यासच झालेला नाही,असं म्हणून रोज घरात रडते, असं तिच्या पालकांचं म्हणणं.

 

मी आईवडिलांना भेटायला बोलावलं. बोलता बोलता असं लक्षात आलं की, आपली मुलगी अभ्यास करते,एवढं एकच वाक्य ते ठामपणे सांगतात.पण ती अभ्यास करते म्हणजे नेमकं काय करते, हे मात्र दोघांनाही सांगता येत नाहीय. कारण काय? कारण,तिला घरात स्वतंत्र खोली आहे आणि त्या खोलीचं दार सतत बंद असतं. मुलगी नेहमी तिच्या खोलीतच असते आणि अभ्यासही तिच्या खोलीतूनच चालतो... हे ऐकलं आणि मला शंका आली..

 

सध्या "मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र स्पेस दिली पाहिजे" असं सूत्र बऱ्याच मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यवर्गीय कुटुंबांमध्ये फार निगुतीनं,कसोशीनं पाळलं जाताना दिसतंय. "आम्ही आमच्या मुलांसाठी काहीही करायचं बाकी ठेवलेलं नाही" एवढा एकच राग आळवून, उरलेल्या सगळ्या गोष्टी मुलांच्या गळ्यात घालून पालक मोकळे होताना दिसतात.

 

अभ्यासासाठी घरात जागा असावी, इथपर्यंत ठीक आहे.पण जागा असावी म्हणजे स्वतंत्र खोली असावी असा त्याचा अर्थ नव्हे. अभ्यास चांगला व्हावा यासाठी वातावरण शांत असावं, ही गोष्ट एक साधा नियम म्हणून मान्य.पण त्यासाठी संपूर्ण घरादारानं मौनव्रतात वावरावं किंवा जरासुद्धा आवाज होऊ द्यायचा नाही, ही कुठली पद्धत? दहावी-बारावीच काय पण, अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत सुद्धा 'अभ्यासासाठी स्वतंत्र खोली विथ आतून कडी फॅसिलिटी' ची अजिबात आवश्यकता नाही. पण कितीतरी घरांमध्ये भलताच प्रकार दिसतो. मुलांना अभ्यासासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी टॉयलेट ॲटॅच खोली, खोलीत स्वतंत्र वायफाय, स्वतंत्र डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, आणि स्मार्टफोन तर असतोच, इतक्या सोयी.. खोलीचं दार आतून बंद असण्याची परवानगी. दोन्हीं वेळचं जेवण, चहा-कॉफी-दूध-बोर्नव्हिटा, नाश्ता हे सगळं खोलीतच नेऊन देण्याची सोय. घरातल्या घरातसुद्धा डिस्टर्ब करायचं नाही म्हणून बंद खोलीतूनच व्हॉट्सॲपवरून मेसेजेस येतात,त्या मागण्या तात्काळ पूर्ण करायच्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आतूनच धमक्यांचे मेसेजेस किंवा आदळआपट, तोडफोड सुरु होणार हे नक्की. मग त्या मेसेजेस मध्ये 'ताबडतोब मॅगी पाठव' इथपासून ते 'PDF पाठवतो आहे - त्याच्या प्रिंट्स ताबडतोब हव्यात' अशा ऑर्डर्स येतात. त्या 'शून्य मिनिटांत' पूर्ण कराव्या लागतात. अन्यथा कुळाचा उद्धार होतो. 'माझ्यासारखा मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरात जन्माला यावा अशी तुमची लायकीच नाही' हे ऐकून घ्यावं लागतं.

 

आईवडिलांच्या प्रत्येक गोष्टीची टिंगल टवाळी करणं आणि खवचटपणानं टोचून बोलून त्यांचा सतत अपमान करत राहणं, हा मुलामुलींचा फॉर्म्युला होत चालला आहे. कुठल्या एका वीकली टेस्टमध्ये एक मुलगा भरघोस मार्कांनी नापास झाला. घरच्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केली तर, " कालच्या शिळ्या पोळ्यांना सकाळी फोडणी देऊन पोट भरणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी बघितली पाहिजे. आयआयटी ची फी भरण्याची सोडाच, ऐकण्याची तरी लायकी आहे का तुमची?" असं पालकांना भरल्या ताटावर ऐकून घ्यावं लागलं आहे.

 

एका सर्वसामान्य कुटुंबात मुलाच्या स्वतंत्र खोलीत खाऊ आणि सुक्यामेव्याचे डबे भरुन ठेवलेले मी पाहिले, आणि ते कायम भरलेले ठेवावे लागतात,असं ते पालक मला सांगत होते.तेही इम्पोर्टेड लागतात. देशी सुकामेवा चालत नाही.साडेसात ते आठ हजार रुपये दर महिन्याला फक्त सुकामेवा खरेदीसाठी लागतात,असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वर्षाला जवळपास एक लाख रुपयांचा खर्च कुटुंबातल्या फक्त एका माणसाच्या फक्त सुक्यामेव्यासाठी..!

 

बारावीत बायोलॉजी घेतलेल्या आणि मेडिकल प्रवेश परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीला 150₹ किलोने मिळणारे कच्चे शेंगदाणे पोषक नसतात,पण ₹1800 किलो दराने मिळणारे बदामच तेवढे पोषक असतात म्हणे.घरचं जेवण करून एनर्जी मिळत नाही अन् कॅडबरी खाऊन,ओरिओ मिल्कशेक पिऊनच एनर्जी मिळते,ही यांची धारणा. बरं,एवढं करुनही तब्येत चांगली नाहीच..!

 

अगदी माझ्या डोळ्यांसमोर ह्याची अक्षरशः शेकडो उदाहरणं आहेत. गेली दहा वर्षं महिन्याला ४५ ते ५० हजार रुपयांचा खर्च करत,पुण्यात भर मध्यवस्तीतल्या उच्चभ्रू परिसरात,संपूर्ण एसी फ्लॅटमध्ये केवळ अभ्यासाच्या नावाखाली राहणारा आणि दिवसभर ऑनलाईन क्लासच्या नावाखाली चौदा-चौदा तास पॉर्न फिल्म्स आणि वेबसिरिजेस पाहण्यात वेळ घालवणारा एक दिवटा माझ्या पाहण्यात आहे.वयाची तिशी नुकतीच पूर्ण झाली आहे,एक दमडीसुद्धा कमवत नाही.९५₹ लिटर या दराचं A2 दूध त्याला लागतं. ₹३००० दरानं देशी गायीचं शुद्ध तूपच तो खातो. कुठल्यातरी हस्तरेखा तज्ज्ञाकडं सारखा जातो, त्यांची एका व्हिझिटची फी ₹११,००० आहे. ती महिन्यातून कमीत कमी एकदा तरी द्यावी लागतेच.हा सगळा खर्च वडीलच करतात.तरीही हा बहाद्दर स्वतःया वडिलांचा चारचौघात अपमान करायला मागंपुढं पाहत नाही.उलट वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती लवकरात लवकर माझ्या नावावर करावी,अशीच त्याची स्पष्ट इच्छा आहे आणि आजकाल तो तसं बोलूनही दाखवायला लागलाय.

 

एका विद्यार्थिनीच्या वडिलांचा मला फोन आला. मुलीचे प्रश्न अनेक होतेच.पण बोलता बोलता त्यांनी मला एक प्रकार सांगितला.जुलै महिन्यात कॉलेज सुरु झालं आणि डिसेंबर महिन्यात परिक्षा होती. वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी मुलीनं डझनभर वह्या आणून ठेवल्या.पण एक अक्षरही लिहिलं नाही.सगळ्या वह्या तशाच..!पण परीक्षेच्या महिनाभर आधी तिनं वडिलांकडे दहा हजार रुपये मागितले. कशासाठी? तर रेडिमेड नोट्स च्या झेरॉक्स साठी.. "अगं,एवढ्या रकमेच्या झेरॉक्स? काय वेड-बिड लागलंय का तुला?" वडील म्हणाले. "बाबा,सगळे असंच करतात. लिहित कोण बसणार? मोड्यूल घ्यायचं आणि झेरॉक्स काढायच्या.झालं काम.." मुलगी म्हणाली...!वडिलांनी गुमान पैसे काढून दिले. दहा हजार रुपये..

 

पण प्रकरण आणखी आहे.परिक्षेच्या आधी आठ दिवसांपासून मुलगी प्रचंड अस्वस्थ दिसायला लागली. दिवसरात्र सारखी रडायची. घरच्यांनी तिला कारण विचारलं.तर तिनं सांगितलं, "झेरॉक्स काढण्यासाठी ज्या दुकानात गेली होती,त्यानं परिक्षेच्या आधी पेपर देणार म्हणून सांगितलं होतं आणि प्रत्येक पेपरसाठी दीड हजार रुपये यानुसार नऊ हजार रुपये घेतले होते. म्हणून सगळेजण निवांत निर्धास्त होते.  आणि आता अचानक तो माणूस "मी प्रश्न देतो,पण तेच प्रश्न पडतील ह्याची गॅरंटी नाही"असं म्हणायला लागला. त्यामुळं सगळ्यांची पाचावर धारण बसली..!" आता अभ्यासच केलेला नाही, हजारो रुपयांच्या नोट्स हातात आहेत, पण कुठल्या नोट्स कशाच्या आहेत हेसुद्धा पाहण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळं, ऐनवेळी एवढा भलामोठा अभ्यास होणार कसा? याचं टेन्शन आलं..!

 

स्वातंत्र्य मिळालं तरी ते नेमकं वापरायचं कसं? कुठं? किती? केव्हा? आणि कशासाठी? ह्याची स्पष्टता नसेल तर, तेच स्वातंत्र्य अनर्थाचं कारण होऊन बसतं. "आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण केलं बघा" असं म्हणणारे पालक नक्की काय सुचवू पाहत असतात? याचा जरा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. "तो म्हणेल तसं सगळं केलं, त्यानं जे जे मागितलं ते ते दिलं, सगळ्या सोयी केल्या, गाडी दिली, लॅपटॉप दिला, फोन दिला. पण ह्याला साधं पास होणं सुद्धा जमेना.." असं म्हणणारे कित्येक पालक आहेत. ह्यांच्या मुलांची माहिती काढून बघितली की,धक्काच बसतो. कारण,ज्या गोष्टींची अजिबात आवश्यकता नाही,अशाच कित्येक गोष्टी पालकांनी सोय म्हणून दिलेल्या असतात.

 

उदाहरणार्थ, एसी. "अभ्यासात व्यत्यय नको,उकाड्याचा त्रास नको,निवांत अभ्यास व्हावा, म्हणून मुलाच्या खोलीत एसी बसवला. एसी बसवल्याचं भरमसाठ बिल यायला लागलं. तेही भरलं. पण हा एसी लावून चक्क झोपा काढतो. दिवसासुद्धा बेडवर अंगभर रग पांघरून घेऊन बसतो. लोळत पडतो. अभ्यास तर लांबच राहिला. पण आता त्याचं घरातल्या घरात हॉलमध्ये येणंसुद्धा बंद झालंय. एसी नाही तिथं बसवतच नाही, असं म्हणतो. घरी अभ्यास होईना हे लक्षात आलं, म्हणून आम्ही अभ्यासिका लावली. तर तिथंसुद्धा ह्यानं एसी असलेलीच अभ्यासिका बघितली. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हा एसी बसवला असं झालंय आता."अशी तक्रार घेऊन दोनच दिवसांपूर्वी एक पालक आले होते.

 

दुसरं उदाहरण,म्हणजे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं लायसन्स. "तसा तो सहावी-सातवीत असल्यापासूनच गाडी चालवायला लागला.मीच शिकवली गाडी. म्हटलं, मला मिळाली नाही, त्याला मिळू देत. सोसायटीच्या आजूबाजूला चालवायचा. आठवीपासून सकाळी लवकर ट्यूशन असायची. त्याला गाडी घेऊन जायचा. तेवढाच वेळ वाचेल म्हणून आम्हीही दुर्लक्ष केलं. दहावीची परिक्षा झाल्या झाल्या लगेच लायसन्स काढून दिलं. बारावीच्या परीक्षेनंतर लगेच फोर व्हीलरचं लायसन्स काढून दिलं. आता रात्री- अपरात्री फोर व्हीलर घेऊन फिरतो. रोज कॉलेजला कार घेऊन जातो. रात्री दोनच्या आत घरी येत नाही. सकाळी अकरा वाजेपर्यंत उठत नाही. घरचं एकही काम करत नाही. घरचं जेवण नको असतं. रोज कुठल्या न कुठल्या मित्राचा वाढदिवस असतोच. मग रात्री कार घेऊन फिरायचं, बाहेरूनच खाऊन यायचं आणि झोपायचं. कुठून झक मारली आणि ते लायसन्स काढून दिलं असं झालंय आता.." असं रडणारे कितीतरी पालक दर आठवड्याला मला भेटतात.आताशा अशा पालकांचं प्रमाण वाढायला लागलंय.

 

ज्याची अजिबात आवश्यकता नाही,अशा गोष्टी आपण मुलांना सोयीच्या नावाखाली का देतो? आणि त्या गोष्टींचा खरोखरच जो वापर अपेक्षित असतो, तोच वापर आपली मुलं करतात का? हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या मुलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं सामाजिक आयुष्य आणि त्यांचं करिअर हा चौरस जर नीट जुळायला हवा असेल तर मुलांना सोय म्हणून देत असलेल्या गोष्टींबाबत दक्ष व्हा. पूर्ण आणि साधकबाधक विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ऐपत हा मुद्दा पूर्ण बाजूला ठेवा आणि *'गरज की चैन ?' याची स्पष्टता आधी मिळवा. सोयीसुविधांचा अतिरेक टाळायला सुरुवात करा. आणि *"आम्हाला आमच्या वयात मिळालं नाही, म्हणून देतो"*हा राग आळवणं बंद करा. कारण,त्यातला प्रत्येक सूर विसंवादीच आहे.*

 

"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले" ही जशी वस्तुस्थिती आहे, तशीच *" घाम गाळून कष्ट केल्याशिवाय आणि त्याचं अपेक्षित फळ मिळवून दाखवल्याशिवाय काहीही अधिकचं मिळणार नाही"* हा नियम कुटुंबात रुजवण्याची फार आवश्यकता आहे.पण असे निर्णय घेणं पालकांना फार जड वाटतं. धाडस होत नाही. मुलांना नाही म्हणणं जमत नाही. कठोर व्हायला नको वाटतं.

 

पण खरंच एक फायद्याची गोष्ट सांगतो, ज्यांच्या मित्रपरिवारात चांगल्या समुपदेशकांचा अंतर्भाव आहे, ज्यांच्या कौटुंबिक मित्रांमध्ये कुणी उत्तम काऊन्सेलर आहे, आणि वेळप्रसंगी प्रत्येक महत्वाचा निर्णय घेताना त्याच्याशी चर्चा करुनच गोष्टी ठरवल्या जातात,तिथं समस्या कमी असतात. म्हणून,"काऊन्सेलरशी नित्य संवाद" फायद्याचा..!

 

©️ मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, करिअर काऊन्सेलर

संचालक - प्रमुख,

आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....